---Advertisement---

महापालिकेसाठी ठाकरे गटाने ठोकला शड्डू ! निवडणुकीसाठी कोअर कमिटी स्थापन

by team

---Advertisement---

जळगाव : जळगाव शहर महापालिकेची निवडणूक संपूर्ण ताकदिनिशी लढविण्याचा निर्णय घेत ठाकरे गटाने शड्डू ठोकला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.

ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत हे शनिवारी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. शहरातील अजिंठा या शासकीय विश्रामगृहात खा. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांची बैठक पार पडली.

महिनाभरात कमिटी देणार अहवाल

बैठकीनंतर ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत यांनी सांगितले की, राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी यंदापासून कोअर कमिटीचा प्रयोग राबविला जात आहे. त्यामुळे यंदा जळगाव महापालिकेसाठी देखिल कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यात महापौर, उपमहापौर, नितीन लढ्ढा, महानगरप्रमुख शरद तायडे, प्रशांत नाईक यांच्यासह सहा ते सात जणांचा समावेश आहे. ही कोअर कमिटी शहरातील संपूर्ण 19 प्रभागातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून महिनाभरात अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर मनपा निवडणुकीची दिशा ठरविली जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

स्वबळ कि आघाडी निर्णय नंतरच

महापालिका निवडणुकांच्या तयारीच्यादृष्टीने ठाकरे गटाचे संघटन मजबूत आहे. तसेच येणारी महापालिकेची निवडणूक ही खा. संजय राऊत यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. त्यामुळे स्वबळ की आघाडी याबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, मनपाचे माजी सभागृह नेते नितीन लढ्ढा, माजी महापौर जयश्री महाजन, माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment