---Advertisement---
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर महाराष्ट्राचे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे अत्यंत शोकाकुल वातावरणात विसर्जन करण्यात आले. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते हा भावनिक विधी पार पडला.
दोन वर्षांपूर्वी विकासकामांना गती देण्यासाठी ज्या धरणाची पाहणी दादांनी केली होती, त्याच पाडळसरे धरणाच्या कुशीत आज त्यांच्या अस्थी विसावल्या… हजारो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आधार असलेल्या या धरणात दादांच्या स्मृती, विचार आणि कार्य सदैव जिवंत राहतील, अशी भावनात्मक प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अस्थीकलश दर्शनानंतर निघालेल्या रथयात्रेला प्रत्येक गावात उस्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, कार्यकर्ते व दादाप्रेमींनी मार्गस्थ ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. हजारो कार्यकर्त्यांनी अश्रूंनी निरोप देत दादांचे अस्थीदर्शन घेतले.
---Advertisement---
राज्याच्या विविध भागांत स्व. अजितदादांच्या अस्थी पाठवण्यात आल्या असून, प्रत्येक ठिकाणी जनतेने भावनिक निरोप दिला. “दादा गेले नाहीत, ते विकासाच्या वाटेवर आणि जनतेच्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत,” अशा शब्दांत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्व. अजितदादा पवार यांचे विचार, निर्णय आणि विकासाभिमुख नेतृत्व पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. दादा गेले नाहीत, ते विकासाच्या वाटेवर, जनतेच्या हृदयात कायमचे कोरले गेले…!









