---Advertisement---
पाचोरा तालुक्यातील परधाडे गावात बंधूप्रेमाचे एक हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण समोर आले आहे. धाकट्या भावाच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मोठ्या भावानेही काही तासांतच प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परधाडे येथील ६५ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, धाकट्या भावाच्या जाण्याने व्यथित झालेल्या त्यांच्या ७० वर्षीय थोरल्या भावाची प्रकृती अचानक बिघडली. स्मशानभूमीतून परतल्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. लहान भावाची चिता शांत होण्यापूर्वीच मोठ्या भावानेही जगाचा निरोप घेतल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.
गावात एकाच दिवशी दोन अंत्ययात्रा निघाल्याने ग्रामस्थ सुन्न झाले. सकाळी धाकट्या भावावर अंत्यसंस्कार पार पडले, तर दुपारी ४ वाजता मोठ्या भावावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुहेरी दुःखामुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन्ही भावांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. एकाच्या विरहात दुसऱ्याने सोडलेला प्राण ही घटना सध्या संपूर्ण तालुक्यात भावनिक चर्चेचा विषय ठरत आहे.









