---Advertisement---
इयत्ता दहावीच्या निकालात तीन विद्यार्थी राज्यात प्रथम…!
(पंढरपूर- प्रतिनिधी) ज्ञानाची परंपरा, संस्कारांची श्रीमंती आणि गुणवत्तेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांनी यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर ने अभूतपूर्व यश संपादन करत संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विश्वात पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाचा सुवर्णठसा उमटवला आहे. कवठेकर प्रशाला, द. ह. कवठेकर प्रशाला आणि पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेच्या तिन्ही शाखांनी यंदाही “गुणवत्ता, संस्कार आणि शिस्त” या त्रिसूत्रीचा तेजस्वी प्रत्यय घडवत दैदिप्यमान यशाची परंपरा अबाधित राखली आहे.
यंदाच्या माध्यमिक शालांत परीक्षेत कवठेकर प्रशालेचे चि. मिहिर मकरंद बडवे आणि चि. रुद्र अभय उत्पात यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर द. ह. कवठेकर प्रशालेचा चि. अथर्व अमित वाडेकर यानेही १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. या त्रिवेणी यशामुळे संपूर्ण पंढरपूर शहर अभिमानाने उजळून निघाले आहे.
कवठेकर प्रशालेचा निकाल यंदाही गौरवास्पद ठरला. एकूण २७० विद्यार्थ्यांपैकी तब्बल २६० विद्यार्थी उत्तीर्ण होत प्रशालेने ९६.५० टक्के निकालाची मानाची पताका फडकावली. कु. साक्षी प्रवीदत्त वांगीकर हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर चि. आदित्य आनंद उत्पात याने ९५.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, संस्कृत विषयात चार विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवत प्रशालेच्या गुणवत्तेच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या २५ विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीची आणि बुद्धिमत्तेची झळाळी दाखवून दिली.
द. ह. कवठेकर प्रशालेनेही उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत ९४ टक्के निकाल नोंदविला. २५२ विद्यार्थ्यांपैकी २३५ विद्यार्थी यशस्वी झाले. कु. सान्वी सचिन कलढोणे हिने ९९.६० टक्के, चि. सार्थक सिद्धेश्वर लेंगरे याने ९९.२० टक्के, कु. धनश्री राहुल लिगाडे हिने ९७.४० टक्के, तर कु. सई महेश तेंडुलकर हिने ९७.२० टक्के गुण मिळवत प्रशालेच्या यशात भर घातली. गणित आणि संस्कृत विषयांत तीन विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवून शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक गाठला. विशेष गुणवत्तेत तब्बल ९७ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलनेही शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करत संस्थेच्या यशमालिकेत मानाचा दुवा जोडला. कु. अनुष्का आप्पासाहेब लेंडवे हिने ८६ टक्के गुणांसह प्रथम, कु. मृणाली प्रकाश शिनगारे हिने ८३.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. अनुष्का रणजीत काळुंगे हिने ८३.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व शाखांचे हे उज्ज्वल यश म्हणजे केवळ निकालाची आकडेवारी नसून, विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेल्या संस्कारांचे, शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे तेजस्वी फलित आहे. सुमारे ८० वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या संस्थेने केवळ गुणवंत विद्यार्थीच घडवले नाहीत, तर समाजाभिमुख, संस्कारक्षम आणि कर्तृत्ववान नागरिकांची पिढी घडवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल आयोजित गौरव समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर, मानद सचिव श्री. सु. र. पटवर्धन, संस्था सदस्य डॉ. मिलिंद जोशी, श्री एस. पी. कुलकर्णी, श्री संजय कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना मानद सचिव श्री. सु. र. पटवर्धन यांनी, “गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अखंड परंपरा अशीच सुरू राहील आणि या प्रशाला राष्ट्रासाठी कर्तृत्ववान नागरिकांची सशक्त पिढी घडवत राहतील,” असा विश्वास व्यक्त केला.
संस्थेच्या चेअरमन श्रीमती विणाताई जोशी, अध्यक्ष श्री. नानामालक कवठेकर, मानद सचिव श्री. सु. र. पटवर्धन, सु.त्री. अभ्यंकर आणि सर्व संस्था सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील, द. ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एम. कुलकर्णी तसेच पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मोहोळकर मॅडम यांची शैक्षणिक वाटचाल अत्यंत विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच पंढरपूरमधील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमान, आनंद आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले असून, “संस्कारातून गुणवत्ता आणि गुणवत्तेतून यश” या संस्थेच्या ध्येयवाक्याचा पुन्हा एकदा प्रत्यय सर्वांना आला आहे.









