जळगाव : “शासन आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित ‘समाधान शिबिरा’चे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणले की, “या शिबिराचं नावच ‘समाधान’ आहे… आणि खरं समाधान म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटणं. नागरिकाच्या डोळ्यांत दिसणारं समाधानच आमच्या कार्याचं खरं मोजमाप आहे,” असे भावनिक उदगार पालकमंत्र्यांनी काढले. “पूर्वी नागरिकांना कामासाठी तहसील कार्यालयात जावं लागायचं; पण आता शासनच त्यांच्या दारी पोहोचत आहे. ही केवळ औपचारिकता नसून प्रशासन व जनतेमधील माणुसकीची नाळ दृढ करणारा उपक्रम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगाव तहसील कार्यालयाने खोटेनगर येथील दिपलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ‘समाधान शिबिरा’त पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार सुरेश भोळे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार राहुल वाघ, नवीन भावसार, मोनाली लंगरे, माजी नगरसेवक मनोज चौधरी, डॉ. चंद्रशेखर पाटील, सहायक गटविकास अधिकारी सरला पाटील आदी मान्यवर, तसेच विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, तलाठी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, या शिबिरांतून गरजू आणि पात्र जनतेपर्यंत योजना पोहोचविल्या जात असल्याबद्दल समाधान वाटते. या शासकीय योजना गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे काम फक्त महसूल विभागाचे नाही, तर सर्व विभाग एकत्रितपणे करत आहेत, असेच काम करत रहा.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 135 पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप
जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांच्या अंतर्गत एकूण 135 पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यामध्ये महसूल विभागातील 23 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. कुटुंब अर्थसहाय योजना व विशेष सहाय योजनेतून 23 लाभार्थ्यांना मदत मिळाली. पुरवठा विभागाचे 22 लाभार्थी, विविध प्रकारचे दाखले प्राप्त केलेले 25 लाभार्थी, आरोग्य विभागाच्या योजनांचे 17 लाभार्थी, कृषी विभागाचे 2 लाभार्थी, पंचायत समितीच्या योजनांचे 3 लाभार्थी आणि म.न.पा. जळगाव अंतर्गत 10 लाभार्थ्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी समाधान शिबिराची संकल्पना, उद्दिष्टे व उपयुक्ततेबाबत सविस्तर माहिती दिली. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले, तर मोनाली लंगरे यांनी आभार मानले. या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांचे लाभ, कुटुंब अर्थसहाय योजना, विशेष सहाय योजना, पुरवठा विभाग, आरोग्य व कृषी विभाग, पंचायत समितीच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आ. सुरेश भोळे यांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन आढावा घेतला.