भडगावात दुर्दैवी घटना: बुडालेल्या दोघांना वाचवताना दोन जणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू, परिसरात हळहळ…..!

---Advertisement---

 

भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये नदीम खान नसीम खान (वय 27) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय 16) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात काही मुले अडकल्याचे लक्षात येताच नदीम खान आणि काफिया पिंजारी यांनी धाडसाने नदीत उडी घेत मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जिहान आसिफ शेख (वय 8) आणि शगुफ्ता जब्बार शेख (वय 35) यांना नदीम खान यांनी सुरक्षित बाहेर काढले. मात्र काफिया पिंजारी याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना नदीपात्रातील खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल गेला आणि दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे तसेच इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली.

नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना दिल्या. तसेच नगरसेवक मिर्झा आसिमभाऊ, अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला. नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात सहभाग घेतला.

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनी प्राण गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---