Nandurbar Crime News: नंदुरबार शहरात अवैध सावकारी बोकाळली, तरुणाने संपविले जीवन

नंदुरबार : जिल्ह्यात अवैध सावकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच प्रकारे व्याजाने दिलेल्या पैशातून वाद होऊन एकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली असल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे. याप्रकरणी जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नंदुरबार शहरात अवैध सावकारीने डोके वर काढले आहे. अवैध सावकार हे त्यांच्या मनमर्जीनुसार व्याजाची आकारणी करत असतात. या अवैध सावकारीवर शासकीय यंत्रणेचा वचक राहिला नसल्याने एकास आत्महत्या करावी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवार, ३१  डिसेंबर रोजी  म्हणजेच सर्वत्र थर्टी फस्ट साजरा केला जात होता. याच प्रसंगी कोकणी हिल, देवमोगरा येथील रहिवाशी रवींद्र येवले या तरुणाचे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनल कविताबाई रविंद्र येलवे (वय- ३७) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, रविंद्र याने उसनवार घेतलेली रक्कम आणि व्याज ताबडतोब द्यावे, यासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात आला होता. सततच्या या त्रासाला कंटाळून रवींद्रने आत्महत्या केली.  या फिर्यादीवरून जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सचिन चौधरी, दीपक चौधरी आणि आकाश सोनवणे या तीन जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे अधिक तपास करीत आहेत.