---Advertisement---
महापालिका निवडणुकांमुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राडे पाहायला मिळाले, राज्यासह जळगावातही महापालिका निवडणुकीवरून राजकारण मात्र मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळालं, जळगावात महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला भर रस्त्यात शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
17 जानेवारीला मध्यरात्री नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्यासोबत नेमकं काय घडलं…
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले विष्णू रामदास भंगाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार , विष्णू भंगाळे यांचे सहकारी वसंत सोनवणे आणि सागर पाटील यांच्या घराशेजारील प्लॉट जवळ ते उभे असताना 17 जानेवारी रोजी मध्यरात्री 12.05 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी प्रशांत चौधरी व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम मोटरसायकल वरून घटनास्थळी आले. “आमचा उमेदवार निवडणुकीत पडला” या कारणाने दोन्हीही संशयतांनी विष्णू भंगाळे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, दरम्यान एवढ्यावरच न थांबता दोन्हीही संशयतांनी “तुला बघून घेतो, तुझ्या रक्ताची होळी करू” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
सदर प्रकारानंतर नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात या घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार केली, व या तक्रारीला अनुसरून जिल्हा पेठ पोलिसांनी प्रशांत चौधरी व त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, या संदर्भात पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करत आहे. जळगाव महापालिका निवडणुक मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राडा झाला, आणि निकालानंतर झालेल्या या घटनेने मात्र जळगाव शहरात राजकीय वातावरण तापत असल्याने परिसरात मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे.









