---Advertisement---
दिपक महाले
जळगाव : शहरासह एमआयडीसी भागात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून, त्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. अगोदरच एमआयडीसीतील उद्योजक व्यावसायिक रस्त्यांसह मूलभूत सोयी-सुविधांनी त्रस्त असताना, आता उद्योगसमूहांत चोऱ्या, घरफोड्यांसह आता तर गोळीबारासारख्या घटनांनी उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सराईत गुन्हेगारांनी पोलीस प्रशासनाला आव्हानच दिल्याची उद्योजकांमध्ये चर्चा असून, जिल्ह्यात कायदा-व्यवस्था धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव एमआयडीसीमध्ये सध्या उद्योगांसाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे नवीन उद्योगांसाठी जागा उपलब्ध नाही. जिल्ह्यामध्ये सध्या सुमारे एक हजार ८४८ उद्योग असून, त्यापैकी अनेक उद्योग मंदीमुळे अडचणीत आहेत. नवीन उद्योग उभारणीसाठी २५० ते ३०० एकर जागेच्या नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव आहे. सध्या एमआयडीसीत चटई, डाळमिल, केमिकल्स, पीव्हीसी पाइप, सोलर, बॅटरी यांसारखे छोटे-मोठे उद्योग असून, अगोदरच एमआयडीसी व महापालिका असे दोन कर भरताना उद्योजकांची अडचण होत असून, राजकीय पाठबळाअभावी मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. त्यातच उद्योग आवारातून छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रकारही वाढीस लागले आहेत. गावठी बनावटीच्या बंदुकांसह कोयते घेऊन दहशत पसरविण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता तर एमआयडीसी परिसरातील जी सेक्टर-१४ मध्ये विजेता इंडस्ट्रीज नामक कंपनीनजीक घडलेल्या गोळीबार प्रकरणाने पुन्हा एकदा या औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीचे पडसाद उमटले आहेत. गोळीबार घटना नसून एमआयडीसीत सुरू असलेल्या गुन्हेगारीचा तो नमुना आहे.
एमआयडीसी क्षेत्र दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहे. केवळ गोळीबाराचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा या औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या दहशतीचा चेहरा उघड झाला आहे. एमआयडीसीत संघटित गुन्हेगारी बनली आहे. सध्या उद्योजक दहशतीत आहेत. एमआयडीसी परिसरात अनेक पानटपऱ्यांवर, छोट्या दुकानांमध्ये अवैध देशी-विदेश मद्यविक्री होत असल्याचे यापूर्वी घडलेल्या वाद-विवादाच्या घटनांवरून निष्पन्न झाले आहे. उद्योजकांकडून वारंवार याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रारी वजा निवेदनेही देऊनही त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
साखळी मोडीत काढावी लागणार
याआधी अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी टोळीने या परिसरात दहशत माजवली होती. एमआयडीसीतील उद्योजक-व्यावसायिकांनी भीती न बाळगता तक्रार करण्याची मानसिकता तयार केली नाही, तर अशा टोळ्यांचे बळ वाढतच जाईल. स्थानिक राजकीय नेत्यांवर गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालण्याचे आरोप वारंवार झाले आहेत. निवडणुकीच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका आणि उद्योजकांसह व्यावसायिकांचे सहकार्य दोन्ही आवश्यक आहे. मात्र, काळात औद्योगिक विकासाच्या घोषणा केल्या जातात. मात्र, राजकीय गुन्हेगारी साखळीला तोडल्याशिवाय एमआयडीसीला खरी प्रगतीची गती मिळणार नाही. एमआयडीसीचा खुंटलेला विकास आणि गुन्हेगारीचे जाळे मोडण्यासाठी पोलिसांनी ‘मकोका’ सारख्या कडक कायद्यांचा वापर करून टोळ्यांचे नेटवर्क मोडणे, उद्योजकांसह व्यावसायिकांनी एकजूट दाखवीत भीती न बाळगता संघटित पद्धतीने तक्रार करणे आणि राजकीय इच्छाशक्ती गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या साखळीला मोडीत काढणे गरजेचे आहे.
कोंबींग ऑपरेशन तरीही गुन्ह्यांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटनांनी चांगलेच डोके वर काढले आहे. रोज कुठे ना कुठे दरोडा, खून, महिलांच्या चैन ओढणे अशा अनेक घटना समोर आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी पुढाकार घेत जिल्हापेठ, शहर, एमआयडीसी, जळगाव तालुका, रामानंदनगर पोलीस ठाण्यांतर्गत संवेदनशील भागात कोंबिंग ऑपरेशन राबवून तब्बल ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारांना अटक केली होती. त्यात रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे, दारू विक्रेते या प्रकारातील गंभीर गुन्हेगारांचा समावेश होता. तरीही, एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब झाली आहे.
‘दै. तरूण भारत’ने केला भांडाफोड
शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचा भांडाफोड ‘दै. तरूण भारत’ने ठळक मथळ्याखाली प्रकाशित केला होता. आजच्या गोळीबाराच्या घटनेने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भितीपोटी गुंतवणूकदारांची पाठ
एमआयडीसीच्या सुरक्षिततेला लागणारी राजकीय इच्छाशक्तीच सध्या दिसून येत नाही. मूलभूत सोयी-सुविधा, उद्योग उपयोगी पायाभूत सोयी-सुविधा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भयमुक्त वातावरण या तिन्ही गोष्टी येथे कोलमडल्या आहेत. परिणामी गुंतवणूकदार मागे सरकत आहेत, तर स्थानिक उद्योगपती भीतीच्या छायेत आहेत.









