---Advertisement---
जळगाव: रायसोनी नगरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घडली. ज्ञानेश्वर श्रावण राठोड ( रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे.
ज्ञानेश्वर राठोड काही दिवसांपासून रायसोनी नगरातील इमारतीच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता. सोमवारी काम करत असताना पाचव्या मजल्यावरून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खाजगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा : ‘वक्फ’ दुरुस्ती विधेयकाला ‘JPC’ची मंजुरी; १४ बदल स्वीकृत
ज्ञानेश्वरच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जोरदार आक्रोश केला. ज्ञानेश्वर राठोड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.