जळगाव : शहरात जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम २२ मे ते ५ जून या कालावधीत आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शुक्रवार २३ मे पासून शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टिकविरोधी आरोग्य विभागातर्फे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५.५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. पाच व्यावसायिकांकडून ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
खालीलप्रमाणे सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली: गोलाणी मार्केट मधील दहाड प्लास्टिक येथून २२.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. राजकमल टॉकीज रोड येथील भैयाजी कुल्फी यांच्याकडून ३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दोघांकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तिजोरी गल्लीतील सुभाष तोतला यांच्याकडून ८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
तिवारी भैयाजी कुल्फी यांच्याकडून १.५ किलो प्लास्टिक जप्त करुन प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच फृट गल्लीतील अमृतकर किराणा यांच्याकडून १ किलो प्लास्टिक जप्त करून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शा प्रकारे एकूण ३५.५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, मुकेश पाटील, मयूर सपकाळे, रूपेश भालेराव, विशाल वानखेडे, उज्वल बेंडवाल, अजय चांगरे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारावेत.