जळगाव : घरी जात असताना २१ वर्षीय महाविद्यालयीन युवकाला दोघांनी अडवून चापटा-बुक्क्यांनी, लाथांनी खाली पाडून बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना सोमवार, ९ रोजी रात्री आकाशवाणी चौकात वेलनेस मेडीकलजवळ घडली. या प्रकरणी बुधवार, ११ रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा युवक पिंप्राळा परिसरात वास्तव्यास आहे. तो सिनेमा पाहण्यासाठी शहरात गेला होता. रात्री तो आकाशवाणी चौकाकडून घरी जात होता. या चौकात दोन संशयितांनी त्याला पाहताच चापटा- बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथा मारून त्याला खाली जमिनीवर पाडत पुन्हा मारहाण केली. या घटनेत युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उमाकांत वाघ, तसेच आकाश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट देऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच संशयितांचा शोध घेण्याकामी या चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा शोध घेऊन फुटेज प्राप्त करून तपासाला वेग दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी करीत आहेत.
धिंगाणा घालणाऱ्यांकडून तरुणाला मारहाण
औषधीच्या दुकानावर संशयित धिंगाणा घालत होते. त्यांना मनाई केल्याने याचा राग येऊन तिघांनी भावेश मराठे (वय २१, रा. जाकिर हुसेन कॉलनी) या तरुणाला चापटा- बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर दमदाटी करीत लोखंडी वस्तू डोक्यात मारून तरुणाला जखमी केले. ही घटना मंगळवार, १० रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास महाबळ परिसरात जाणता राजा व्यायामशाळेसमोर घडली. याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीनुसार बुधवार, ११ रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात कल्पेश पाटील (वाघ नगर) व त्याचे अज्ञात दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.