Crime News: तरुणावर चौघांकडून प्राणघातक हल्ला, रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

जळगाव  : चार जणांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना हरिविठ्ठल नगरात शनिवारी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार, ११ जानेवारी रोजी हरी विठ्ठल नगराचे रहिवाशी भरत जगन सोनवणे यांना संशयित आरोपींनी शिवीगाळ करत दगडाने डोक्यावर हल्ला केला. भरत सोनवणे यास कोणतेही कारण नसताना संशयितांकडून मारहाण करण्यात आली.  या प्रकरणी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत सोनवणे हे रात्री लाकडी वखारीजवळ उभे असताना संशयित पप्पू शंकर कोकाटे, किरण शंकर कोकाटे (दोघेही रा. तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

प्रथम त्यांनी सोनवणे यांना शिवीगाळ केली आणि अचानक कमरेवर लाथ मारून त्यांना गटारीत ढकलले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दगडाने डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. जखमी भरत सोनवणे यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या फिर्यादीवरून पप्पू आणि किरण कोकाटे तसेच दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.