पाळधीत मोठी दुर्घटना; साईबाबा मंदिरात भक्तनिवासाचा स्लॅब कोसळून 6 ते 7 कामगार जखमी, जखमींपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने काम सुरू असलेल्या मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत 6 ते 7 कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साई बाबा मंदिर परिसरात भक्तांसाठी नव्याने भक्तनिवासाची इमारत उभारण्याचे काम सुरू होते. याच बांधकामादरम्यान अचानक स्लॅब कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी आणि उपस्थित कामगारांनी मदतकार्य सुरू केले. जखमी मजुरांना तात्काळ बाहेर काढत उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यात सहभाग घेतला. त्यांनी जखमी कामगारांची विचारपूस करत त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले.

या घटनेत 6 ते 7 कामगार जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती प्रताप पाटील यांनी दिली आहे. जखमींपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्लॅब अचानक कोसळण्यामागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनीही बांधकामाच्या कामांमध्ये सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---