जळगाव : महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये 57 जागांवर किंवा अधिक जागांवर भाजपाचा दावा राहील असा संकेत आमदार सुरेश भोळे यांनी दिला आहे. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने २५ जून हा रोजी दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मिसा बंदी उदय भालेराव, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.
भाजपाने निवडणुकीतील विजयाला कधीही प्रथम स्थान दिले नाही. प्रत्येक घरा-घरात कमळ चिन्ह जायला हवे ही आमची प्राथमिकता असल्याचे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असून २५ जूनला काळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भाजपातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २५ जून हा संविधानाची हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे.
काँग्रेस आज संविधान बदलणार आहे अशा वल्गना करीत आहे. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी आणीबाणी लागू करुन या संविधानाची हत्या केली आहे व त्यांनी संविधान बदललेले आहे असे यावेळी आमदार सुरेश भोळे म्हणाले. २५ जून रोजी जळगाव शहरातील आणीबाणीच्या काळातील ४३ मिसा बंदी व सत्याग्रही लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत त्यांना प्रश्न विचारला असतात्यांनी स्पष्ट केले की, भाजपाने कधीच विजयाला पहिले स्थान दिलेली नाही.भाजप नेहमी देशहिताला प्रथम स्थान देत आला असून यापुढेही देत राहील असे स्पष्ट केले. जळगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुक लढताना महायुतीमध्ये ५७ जागांच्या पुढे भाजपा दावा करेल. भाजपामध्ये प्रवेश करणारे भरपूर आहेत. पण पक्ष वाढवण्याची गरज असल्याने ते करावे लागते. मात्र, स्वतःचे भले व्हावे याकरिता जे येत असतील त्यांना आम्ही विरोध करणार. समाज उपयोगी जे कामे करतील त्यांना आम्ही नक्की पक्षात प्रवेश देऊ. प्रथम देश, द्वितीय समाज आणि शेवटी मी असा आमचा त्रीसूत्री कार्यक्रम आहे. मी मी म्हणणाऱ्यांना आम्ही दूर ठेवणार आहोत असेही ते म्हणाले. २७ नगरसेवक अपात्र याबाबत ते म्हणाले की तो कोर्टाचा निकाल आहे तो एका दिवसातील दहा वर्षांनी लागू शकतो त्यामुळे आज काही बोलणे योग्य होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.