---Advertisement---
महापालिका निवडणूक संपल्यानंतर सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या त्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे, आज 22 जानेवारी रोजी मंत्रालयात आरक्षण सोडतीची प्रक्रिया ही पूर्ण झाली असून यात जळगाव महानगरपालिकेसाठी ओबीसी महिला राखीव या प्रवर्गातील महिलेला महापौर पदाची जागा मिळणार असल्याचं समोर आलं आहे, जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौरपदी म्हणून कोणाची निवड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
नुकत्याच पार पडलेल्या जळगाव शहर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 46 पैकी 46 जागांवर विजय मिळवता आला असून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडे 23 जागांचं संख्याबळ आहे त्यामुळे बहुमताचा आकडा हा भाजपाकडे असल्याने महापौर पद हे भारतीय जनता पार्टीकडेच असणार आहे. त्यातच आज पार पडलेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत ओबीसी महिला राखीव प्रवर्ग निघाल्याने महापौर पदी कोण विराजमान होणार याबाबत चुरस पाहायला मिळत आहे. ओबीसी महिला या प्रवर्गातून निवडणूक लढलेल्या भाजपच्या एकूण पाच महिला उमेदवार या महापालिका निवडणुकीत विजय झालेले आहेत यात मंडळ अध्यक्ष दिपाली मनोज काळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे व ज्येष्ठ व अनुभवी महिला नगरसेवकांशिवाय पहिल्यांदाच निवडून लढलेल्या माधुरी बारी, विद्या सोनवणे, कविता पाटील हे पर्याय आता पक्षश्रेष्ठींकडे असणार आहे.
मंडळ अध्यक्ष दीपमाला काळे तसेच माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे हे महापौर पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं मानलं जात आहे, दीपमाला काळे यांचे पती मनोज काळे अनेक वर्षांपासून भाजपचे सदस्य असून त्यांनी पक्ष वाढीसाठी व संघटनेसाठी जोरदार कामगिरी बजावली आहे याचबरोबर उज्वला बेंडाळे यादेखील भाजपच्या अनेक वर्षापासूनच्या सक्रिय सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तिसऱ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत व यासह महानगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील अत्यंत चोख रीत्या पार पाडली आहे.
एकंदरीत येत्या काळात महापौर पद कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची भाजप सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.









