---Advertisement---
जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचा शेवट रक्तरंजित झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री जुन्या मारुती मंदिर परिसरात सागर आणि एका संशयित व्यक्तीमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. सुरुवातीला बाचाबाचीपर्यंत मर्यादित असलेला हा वाद काही क्षणांतच हिंसक झाला आणि हाणामारीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
डोक्याला जबर मार लागल्याने सागर याचा जागीच मृत्यू झाला. लागलीच संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सागर बेशुद्ध अवस्थेत पडलेला पाहून तातडीने गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश ऐकून वातावरण हेलावून गेले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. मयत सागरच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या डोक्यावरचा कर्ता पुरुष हिरावला गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आव्हाणे गावात मात्र या घटनेमुळे तणावपूर्ण शांतता पसरली आहे.









