---Advertisement---
रब्बी हंगाम सुरू होत असतानाच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कडधान्यांच्या दरांबाबत विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे. हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत, तर दुसरीकडे तुरीच्या दरात झालेल्या अचानक वाढीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये जाहीर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा दर २१० रुपयांनी वाढवण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना हा हमीभाव मिळताना दिसत नाही.
खते, बियाणे, औषधे, मजुरी आणि सिंचन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले असताना, बाजारात हरभऱ्याला अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. हमीभाव जाहीर असूनही खरेदी कमी दराने होत असल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, तुरीच्या दरात मात्र तेजी दिसून येत आहे. यंदा तुरीसाठी केंद्र सरकारने प्रतिक्विंटल ८ हजार रुपये किमान आधारभूत दर जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तुरीचे दर ६ हजार ५०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. मात्र सध्या बाजारात तुरीचे दर थेट ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले असून काही बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीला ८ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याची माहिती आहे.
यंदा अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, तर ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीने थैमान घातले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात असून, याच कारणामुळे बाजारात दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एकीकडे हरभऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असताना, दुसरीकडे तुरीने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. मात्र येत्या काळात बाजारभाव कोणती दिशा घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.









