---Advertisement---
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य म्हणून मिळणारे १५०० रुपये वेळेवर न मिळाल्याने आणि काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळत नसल्याने जळगावमध्ये महिलांचा संताप उफाळून आला. लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्या काही महिन्यांपासून खात्यात जमा न झाल्याने शेकडो महिलांनी थेट महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले.
“आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या, केवायसीही झाली… मग पैसे कुठे अडले?” असा सवाल आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला. तात्काळ योजनेचे पैसे आमच्या खात्यात जमा करण्यात यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी दहा लाखांपेक्षा अधिक महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र केवायसी पूर्ण असूनही एक लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एकही हप्ता जमा न झाल्याने आणि काही महिन्यांपासून अनेक लाभार्थी महिलांना पैसे मिळत नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, केवायसी व नोंदणीदरम्यान झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित चुका दुरुस्त करून लवकरच अनुदान जमा करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होईपर्यंत महिलांचा असंतोष कायम राहणार असल्याचे चित्र जळगावमध्ये दिसून येत आहे.









