पाचोर्‍यात शिवजयंतीच्या पावतीवरून वाद अन् हॉटेलची तोडफोड…! CCTV मध्ये घटनेचा थरार कैद”

---Advertisement---

 

पाचोरा शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ आणि हॉटेल दाजीबा पॅलेस येथे शिवजयंतीच्या पावती फाडण्यावरून वाद निर्माण होऊन काही जणांनी जबरदस्तीने हॉटेलमध्ये घुसखोरी करत तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाचोरा शहरातील काहीजण शिवजयंतीच्या नावावर पावती फाडण्यासाठी हॉटेलमध्ये आले. मात्र त्यावेळी हॉटेल ‘भाग्यलक्ष्मी पॅलेस’ आणि हॉटेल दाजीबा पॅलेस हॉटेलचे मालक तुषार मराठे हे बाहेरगावी असल्याने फोनवरून चर्चा सुरू असतानाच संबंधित टोळक्याने रागाच्या भरात हॉटेलमधील खुर्च्या, टेबल्स व इतर साहित्याची तोडफोड केली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे या प्रकाराचे ठोस पुरावे उपलब्ध झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्यांना धमकावणे आणि दहशत निर्माण करणे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर पाचोरा शहरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी हॉटेल संचालक तुषार मराठे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे थेट न्यायाची मागणी केली असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

“जर व्यापारीच सुरक्षित नसतील, तर राज्याची प्रगती कशी होणार ? एक मराठा समाजाचा तरुण उद्योग उभा करतो आणि त्यालाच अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---