---Advertisement---
राज्यासह जळगाव जिल्ह्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत असून काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस बरसत आहे. जळगाव जिल्ह्यात तीन दिवसापूर्वी २७ जानेवारी रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, दरम्यान आता फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील अवकाळीचे संकट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे तापमानात चढ उतार होत असलयाने थंडीचा जोर ओसरला आहे. काल दिवसाच्या तापमानात ३ अंशापर्यंतची घसरण दिसून आली. बुधवारी ३१.५ अशांवर असलेले कमाल तापमान गुरुवारी घसरून २७.६ अंश इतके होते. तर रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली. गुरुवारी रात्रीचे किमान तापमान १५ अंशावर होते.
दरम्यान, आज ढगाळ वातावरण्याच्या कालावधीत किमान तापमान १४ ते १६ अंशांवर राहील. ज्यामुळे रात्री आणि पहाटे गारठा जाणवणार आहे. कमाल तापमान ३० ते ३३ अंशांवर राहण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी हवामान उबदार असेल. मात्र, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळणार असल्याने दिवसभर हवेत एक प्रकारचा ओलावा आणि थंडावा टिकून राहील.
दरम्यान २७ जानेवारी रोजी जळगावमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे हजारो क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रब्बी पिकांची काढणी होते. मात्र, याच काळात राज्यातील काही जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.









