पाकचं इस्लामाबाद हादरलं ! नमाजदरम्यान मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; स्फोटात 50 जणांचा मृत्यू….

---Advertisement---

 

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आज दहशतवादी हल्ल्याने हादरली आहे. नमाज सुरू असतानाच एका मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA हॉस्पिटलसह जवळच्या तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने या हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं असून मृतांच्या आकड्याबाबत अद्याप अधिकृत माहितीमध्ये तफावत दिसून येत आहे.

हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळी मृतदेहांचे अवयव विखुरलेले दिसून येत होते. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटानंतर काही क्षणांतच पोलीस आणि पाकिस्तानी लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून संपूर्ण परिसराला कडक सुरक्षा घेराव घालण्यात आला आहे.

स्थानिक मीडियानुसार हा स्फोट कसर-ए-खदीजतुल कुबरा मशिदीत झाला असून या मशिदीला इस्लामाबादमधील ‘बडी मशीद’ म्हणूनही ओळखलं जातं. घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. ज्या तारलाई परिसरातील मशिदीत हा हल्ला झाला, ती शिया समुदायाची मशीद असल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानात शिया समुदायाची लोकसंख्या सुमारे 2 कोटी असून ती देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 ते 12 टक्के आहे.

---Advertisement---

 

विशेष म्हणजे, नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमध्ये झालेला हा दुसरा मोठा स्फोट आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये इस्लामाबाद कोर्टाबाहेर झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू आणि 36 जण जखमी झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान संघटनेने स्वीकारली होती.
या ताज्या हल्ल्यामागे कोण आहे, याचा तपास अद्याप सुरू असून पाकिस्तानात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---