---Advertisement---
एरंडोल शहरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी एरंडोल संघर्ष समितीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
एरंडोल शहराला अंजनी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानाही शहरात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. संतप्त नागरिकांनी भगवा चौकातून मोर्चाला सुरुवात करत नगरपालिका कार्यालयावर धडक दिली.
मोर्चादरम्यान महिला आणि पुरुषांनी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली. तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून त्याची माहिती नागरिकांना वेळोवेळी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
नगरपालिका कार्यालयात नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि मुख्याधिकारी अमोल बागुल यांना संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यानंतर नगराध्यक्षांच्या कार्यालयात नागरिक, महिला आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीत नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत विविध समस्या मांडल्या. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण वाढल्याचे सांगितले. नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी नळांना तोट्या लावाव्यात तसेच पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
तसेच पूर्वीचे लमांजन पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.









