आधी कोरोना…नंतर हंता…आता इबोलाचा कहर..! 245 संशयित रुग्ण, 80 रुग्णांचा मृत्यू; WHO सतर्क…

---Advertisement---

 

जगभरात हंताव्हायरसच्या चर्चेनंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील काँगो देशात इबोला विषाणूचा मोठा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत 245 हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. तर या साथीमुळे सुमारे 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली आहे.

आफ्रिका CDC ने काँगोच्या इतुरी प्रांतात इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. मोंगवालू आणि रवामपारा या भागांमध्ये सर्वाधिक संसर्गाची नोंद झाली असून काही रुग्णांच्या नमुन्यांमध्ये इबोला विषाणूची प्रयोगशाळेत पुष्टी झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. संसर्गाचा तपास करण्यासाठी आणि नमुने गोळा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष पथक काँगोमध्ये पाठवण्यात आले आहे.

इबोला व्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार मानला जातो. संक्रमित व्यक्तीचे रक्त, उलटी, शारीरिक द्रव्ये किंवा थेट संपर्कातून हा विषाणू पसरू शकतो. गंभीर अवस्थेत रुग्णाला ताप, रक्तस्त्राव, अशक्तपणा आणि अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, इबोलाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये इबोला विषाणू, सुदान विषाणू आणि बुंदीबुग्यो विषाणू हे प्रकार अधिक धोकादायक मानले जातात. यावेळी काँगोमध्ये आढळलेल्या विषाणूचा प्रकार नेमका कोणता आहे, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.

इबोलाग्रस्त भाग युगांडा आणि दक्षिण सुदानच्या सीमेजवळ असल्यामुळे इतर देशांमध्येही संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेजारील युगांडा मध्येही एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित रुग्ण काँगोमधून आला होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मृताच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवून जागतिक आरोग्य संघटनेकडून काँगोला आपत्कालीन मदत आणि वैद्यकीय सहाय्य पुरवण्यात येत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---