---Advertisement---
जळगाव : गेल्या महिनाभरापासून उन्हाच्या तीव्र झळा आणि ४४ ते ४५ अंशांच्या प्रचंड तापमानामुळे अक्षरशः भाजून निघालेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत जिल्ह्याचा पारा ३९ अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात पुढील आठवडाभर जरी पावसाची चिन्हे नसली, तरी तापमानात होणाऱ्या या लक्षणीय घटीमुळे नागरिकांची भीषण उकाड्यापासून सुटका होणार आहे. याशिवाय ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे उष्णतेपासून मोठा दिलासा देतील.
हवामान अभ्यासकांच्या मते, तापमानात अचानक झालेल्या या बदलामागे वाऱ्यांची बदललेली दिशा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
राजस्थानच्या वाळवंटी भागाकडून येणाऱ्या या अतिउष्ण वाऱ्यांमुळे जिल्हा होरपळून निघाला होता. मात्र, आता पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची स्थिती झाली आहे. जळगावकडे येणारे वारे आता थेट अरबी समुद्राकडून येण्याची शक्यता आहे. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि अंशतः ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा वेगाने खाली येईल.
जळगाव जिल्ह्यात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असली, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जळगावकरांची पावसाचीही प्रतीक्षा संपणार आहे. २५ मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यात चांगल्या मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.









