महाराष्ट्र दुःखात असताना एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्धार….!

---Advertisement---

 

राज्यात शोककळा पसरली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी येत्या 9 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस कोणत्याही स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवंगत अजित पवार यांच्या निधनाने केवळ राजकीय वर्तुळालाच नाही, तर सर्वसामान्य जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “अजित दादांच्या जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. मी वैयक्तिकरित्या माझा एक जवळचा सहकारी आणि मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून निघणारी नाही.” त्यांनी याबाबत X पोस्ट करून माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण पूर्णपणे सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या कठीण काळात राज्य सरकार आणि महायुती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना आवाहन केले आहे की, वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, बॅनर-होल्डिंग लावू नयेत, पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नयेत.

दुःखाच्या काळात कोणताही जल्लोष किंवा उत्सव करणे योग्य ठरणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे राजकीय व सामाजिक स्तरावर स्वागत होत आहे. अनेकांनी हा निर्णय संवेदनशीलता, माणुसकी आणि लोकभावनेशी सुसंगत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असताना, एकनाथ शिंदेंचा हा निर्णय राज्याच्या भावनांचे प्रतिबिंब मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---