घनदाट जंगल…निर्जन शिवार…आणि जमिनीवर पडलेला अर्धवट जळालेला मृतदेह; थरारक घटनेच भयावह सत्य समोर !

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय शिवार परिसरात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या घटनेचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ही हत्या एका तृतीयपंथी महिलेची असल्याचे निष्पन्न झाले असून प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासांत आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पद्मालय वनपरिक्षेत्रातील नागदुली रस्त्यालगतच्या जंगलात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. निर्जन आणि घनदाट जंगलाचा भाग असल्याने हा मृतदेह कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा ठिकाणी टाकण्यात आला होता.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने मृतदेहाची ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहरा व छातीचा भाग पेट्रोल टाकून जाळला होता. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 16/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) व 238 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

मृतदेहाच्या पायाच्या नखांवर असलेले मॅजंटा रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची मुनी हे ओळख पटवण्यासाठी महत्त्वाचे धागे ठरले. तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावर आढळलेल्या अळ्यांच्या (मॅगॉट्स) वाढीचा अभ्यास करून मृत्यू 30 किंवा 31 जानेवारी दरम्यान झाल्याचे निश्चित केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत तृतीयपंथी महिलेचे नाव आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे मूळ छत्तीसगड च्या राजनांदगाव जिल्ह्यातील सोनसरार खैरागड येथील रहिवासी होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. वैयक्तिक वादातून आणि रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात बियरची बॉटल मारून तसेच ओढणीने गळा आवळून हत्या केली. आणि हत्येनंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावरील कपडे काढले आणि मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह अर्धवटच जळालेला अवस्थेत आढळून आला.

---Advertisement---

 

जळगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे तसेच ईश्वर पाटील, विनोद पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व अंमलदारांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

जंगलात जाळलेला मृतदेह, ओळख पुसण्याचा प्रयत्न आणि गुन्हा कायमचा लपवण्याचा कट—सगळं काही प्लॅनिंगने केलं होतं, पण पोलिसांच्या तपासापुढे सत्य फार काळ लपून राहू शकलं नाही. अवघ्या 48 तासांत आरोपीपर्यंत पोहोचत जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की प्रेमातून जन्मलेला राग जेव्हा गुन्हा बनतो, तेव्हा शेवट बेड्यांमध्येच होतो. कायद्याचा हात लांब असतो… आणि तो प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचतोच !

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---