धुळ्यात खळबळ: भोंदू भगतने तोडले १३ वर्षीय मुलीच्या अब्रूचे लचके; साथीदाराकडूनही लैंगिक शोषण, भोंदू पोलिसांच्या ताब्यात…!

---Advertisement---

 

कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषण, काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्याने राज्यभरात श्रद्धेच्या आड होणारे महिलांचे शोषण चव्हाट्यावर आले. तरीही भोंदुगिरीच्या नावाने चालणारे लैंगिक शोषणाचे प्रकार काही थांबलेले नाही. धुळ्यातही ‘भगत असल्याचे सांगून एका नराधमाने १३ वर्षीय मुलीच्या अब्रुचे लचके तोडले आहे. शिवाय त्याच्या अल्पवयीन साथीदारानेही पीडितेवर बलात्कार केला. पीडितेला ब्लॅकमेल करुन हे काळेकृत्य सुरु होते. सुदैवाने एका सामाजिक कार्यकर्त्यान पुढाकार घेतल्यामुळे पीडितेची हैवानांच्या कैदेतून सुटका झाली. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद मिळताच भोंदुच्या मुसक्या आवळल्या असून त्याचा साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.

देवपूरातील एका अल्पवयीन मुलीने पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात पीडित मुलीला परिसरातीलच एका भगतने घरी बोलावत तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. कहर म्हणजे पिडीतेसोबत अत्याचार करताना त्याने व्हिडीओ शुटींग केली. शिवाय तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. या अत्याचारात त्याने आपल्या एका साथीदारालाही नंतर सामील केले. त्यानेही मुलीच्या शरीराचे लचके तोडले. सलग वर्षभर केलेल्या अत्याचाराची पीडा मुलीच्या आजीला समजताच तिने परिसरातील सुजाण नागरिकांच्या मदतीने पश्चिम देवपूर पोलिसात धाव घेत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनीही मुलीला विश्वासात घेत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार लागलीच दाखल केली. कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते असे भोंदू नराधमाचे नाव असून तो देवपुरातील कदमबांडे नगरातील रहिवासी आहे. तर त्याचा साथीदार अल्पवयीन असून तो संतसेना नगरात राहतो. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोंदू कृष्णासह त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. या घटनेत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन कापडणीस आणि त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता अभिनंदनास पात्र आहे.

भोंदू कृष्णाचे काळेकृत्य उघड !

देवपूर परिसरात कृष्णा हा देवीचा सेवेकरी असल्याचे भासवत श्रद्धेच्या आड काळेकृत्य करायचा. अखेरीस त्याच्या पापाचा घडा भरला. यास निमित्त मात्र पीडितेची आजी ठरली आहे. काल सायंकाळपर्यंत आपली नात घरात दिसून न आल्याने तिच्या आजीची शंका बळावली. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला दिली. त्याने शोधाशोध करत असतानाच पोलिसांना देखील कळविले. सदर मुलगी भगत कृष्णाच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कृष्णा भगतकडे पोहचत त्याला आपला खाक्या दाखवला. त्यानंतर कृष्णा हा पोपटासारखा बोलू लागला.

आजीची दक्षता आली कामी !

१३ वर्ष वयाच्या त्या पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून ती वडिलांसह राहते. हाच गैरफायदा उचलत कृष्णा उर्फ भगत याने मुलीचे शोषण केले. पीडितेची आजी तिला भेटण्यासाठी आली असता मुलगी भेदरलेल्या अवस्थेत वावरत होती. त्यामुळे मुलीसोबत काहीतरी विपरीत घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय आजीच्या मोबाईलवर कृष्णा भगत याचे सतत येणारे कॉल पाहून हा संशय अधिक पक्का झाला. दरम्यान, कृष्णा भगत याने अन्य मुलींचेही लैंगिक शोषण केले किंवा नाही, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.



Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---