---Advertisement---
लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात परस्पर सन्मान, आदर आणि विश्वासाला विशेष महत्त्व असतं. या विश्वासावरच संसाराची गाडी पुढे सरकत असते. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने या नात्याच्या पायालाच तडा दिला आहे. पतीनेच पत्नीचा विश्वासघात केल्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.
नशेच्या आहारी गेलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला पैशांसाठी मित्रांसोबत पाठवलं आणि याच संधीचा फायदा घेत त्या दोघांनी विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना अमरोहाच्या नौगांवा सादात परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पत्नीला सांगितलं की काही पैशांची व्यवस्था करायची असून त्यासाठी तीने त्याच्या दोन मित्रांसोबत जावं. पत्नीने सुरुवातीला नकार दिला. मात्र “मी मागून बाईकवर येतो” असं सांगत पतीने तिला विश्वासात घेतलं आणि मित्रांसोबत पाठवलं. त्यानंतर आरोपी मित्रांनी महिलेला निर्जन ठिकाणी नेलं, तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.
या घटनेनंतर पीडितेने धाडस करून संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. मात्र त्याने उलट तिला गप्प राहण्यास सांगितलं. मित्रांविरोधात पोलीस तक्रार करू नये, कोणालाही काही सांगू नये, अशी धमकी दिल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. सात दिवस ती मानसिक तणावाखाली होती. अखेर तिचा संयम सुटला आणि तिने आपल्या भावाला सर्व घटना सांगितली.
यानंतर महिलेचा भाऊ तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









