---Advertisement---
शहादा नगर परिषदेकडून घनकचरा व्यवस्थापनात अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून शहरातील ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात आले आहे. हे खत आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून इच्छुकांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून खत घेऊन जावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शहरातील डंपिंग ग्राउंड आणि घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी केली. शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडवर आणून त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत शेतकऱ्यांना केवळ २०० रुपये प्रति टन दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी खत घेण्यास सुरुवात केली असून इतर इच्छुकांनीही नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पावसाळ्यात कचरा विल्हेवाट प्रक्रियेदरम्यान डंपिंग ग्राउंडवर जागेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शहरातील कचरा केवळ डंपिंग ग्राउंडमध्येच टाकावा, इतरत्र टाकू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांनाही स्वच्छतेबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. घरातून कचरा देताना ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत द्यावा, असे सांगण्यात आले. स्रोतस्तरावरच कचऱ्याचे विलगीकरण झाल्यास पालिकेवरील ताण कमी होऊन शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
यावेळी पालिकेचे अभियंता संदीप सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक राहुल थोरात, प्रज्ञाशील निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.









