पारोळ्याजवळ गोवंशाची निर्घृण वाहतूक करणारा पिकअप जप्त; दोन आरोपींना अटक, २ लाख ६५ हजारांचा माल हस्तगत….!

---Advertisement---

 

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जनावरांची वाहतूक आणि चोरी रोखण्यासाठी पारोळा पोलिसांनी राबवलेल्या नाकाबंदी दरम्यान एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. बहादरपूर रस्त्यावरील भोलाणे गावानजीक एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयतेने बांधून नेली जाणारी ६ गुरे (गोवंश) पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, वाहनासह एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मे ते १६ मे दरम्यान बहादरपूर रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली होती. १६ मे रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास संशयास्पद वाटणारे एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH 48 T 5029) पोलिसांना येताना दिसले. पोलिसांनी हाताने इशारा करून गाडी थांबवली.

गाडी थांबवल्यानंतर चालकाने वाहनात भाजीपाला असून तो धुळे येथील मार्केटमध्ये घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, गाडीच्या मागच्या बाजूला ताडपत्री पूर्णपणे बांधलेली होती आणि आतमधून जनावरांचा आवाज येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी ताडपत्री उघडून पाहिली असता, आत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक दृश्य समोर आले.

वाहनाच्या मागील कॅबीनमध्ये ६ गुरे अत्यंत निर्दयतेने कोंडलेली होती. हालचाल करता येऊ नये म्हणून त्यांचे तोंड वाहनाच्या पुढील बॉडीला ताणून आणि पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. या जनावरांना धड श्वासही घेता येत नव्हता. पोलिसांनी तात्काळ या मुक्या प्राण्यांची सुटका केली.

याप्रकरणी पोलिसांनी वाहनातील आसाराम राघो भोई व भूषण सुरेश भिल दोघे रा. (बहादरपूर, ता. पारोळा) दोघांना ताब्यात घेतले. गुरांच्या वाहतुकीबाबत किंवा मालकी हक्कांबाबत त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नव्हता. ही गुरे त्यांनी चाळीसगाव येथील बाजारात विक्रीसाठी नेली जात असल्याची कबुली दिली. याप्रकरणी  पोलीस कॉन्स्टेबल रोशन बलराम पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---