20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद; नागरिकांनी औषधांची आगाऊ व्यवस्था करावी- अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन..!

---Advertisement---

 

आखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार २० मे २०२६ रोजी देशभरातील औषध विक्रेते बंद पाळणार असून, त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील औषध दुकानांवरही होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात देशव्यापी बंदची हाक देण्यात आली असून, ठोक व किरकोळ औषध विक्रीचे व्यवहार बंद राहू शकतात. त्यामुळे नियमित औषधे घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांवरील उपचार घेणाऱ्या नागरिकांनी वेळेपूर्वी औषधांचा साठा करून ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपत्कालीन सेवा, शासकीय रुग्णालये आणि काही निवडक औषध दुकाने सुरू राहण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभाग आणि औषध प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी केमिस्ट बांधवांना या बंदमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. औषधे ही अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने रुग्णांना औषध पुरवठा बंद करणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते, असे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णांना औषधांच्या अभावामुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संघटनांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थितीत औषधे उपलब्ध न झाल्यास सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र.भा. अस्वार आणि श्रीमती क. र. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---