---Advertisement---
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातानंतर एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आणि खळबळजनक शंका उपस्थित केल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी या विमान अपघाताकडे केवळ अपघात म्हणून पाहू नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी विमानाशी संबंधित असलेल्या VSR कंपनीवर थेट संशय व्यक्त केला असून पायलटच्या विमा पॉलिसीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार, डिसेंबर 2025 मध्ये संबंधित कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. अवघ्या एका महिन्यानंतर म्हणजेच जानेवारीत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. एवढ्या मोठ्या रकमेचा विमा अचानक का उतरवण्यात आला, हा गंभीर संशयाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ अपघात आहे की नियोजित घातपात ? की पायलटचा वापर सुसाईड बॉम्बसारखा करण्यात आला, या अँगलनेही तपास झाला पाहिजे, अशी खळबळजनक मागणी मिटकरी यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता अधिक सखोल पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली असली तरी, मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्री भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले. केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता, या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशीही आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूमागील सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, असे ठामपणे सांगताना मिटकरी यांनी इतिहासातील अनेक गूढ मृत्यूंचा संदर्भ दिला. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संभाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूभोवती आजही प्रश्नचिन्ह आहेत, मात्र अजित पवार यांच्या बाबतीत असे घडू देता कामा नये, असा इशारा त्यांनी दिला.
तंत्रज्ञानाच्या युगात केवळ औपचारिक अहवाल देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, तर तो सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांनी पुरावे सादर करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना, जर त्यांच्याकडे काही ठोस माहिती असेल तर ती जनतेसमोर यावी, असेही मिटकरी म्हणाले.









