---Advertisement---
शहादा तालुक्यातील कोळपांढरी येथे सामाईक शेतीच्या हिस्से वाटणीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात लोखंडी-लाकडी पावडी आणि लाकडी दांडक्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक जखमी झाले आहेत. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा तालुक्यातील कोळपांढरी येथील सुरेश घुरसिंग पावरा (वय ३५) आणि आरोपी यांच्यात सामाईक शेतीच्या हिस्से वाटणीवरून वाद सुरू होता. १७ आणि १८ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सुरेश पावरा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपी भिवा घुरसिंग पावरा याने लोखंडी व लाकडी दांडा असलेल्या पावडीने सुरेश यांच्या डोक्याच्या पाठीमागे मारून दुखापत केली. तर आरोपी वसंत किरण पावरा याने लाकडी डेंगाऱ्याने (दांडक्याने) सुरेश यांच्या डोक्यावर वार केला. तसेच आरोपी राकेश मुन्ना पावरा याने सुरेश यांच्या डाव्या पायावर मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना सुरेश यांचे वडील घुरसिंग मलजी पावरा (वय ६०) हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपी गणेश मुन्ना पावरा याने त्यांच्यावरही लाकडी दांडक्याने डोक्याच्या पाठीमागे मारून दुखापत केली. त्यानंतर सुरेश यांची आई बायसीबाई आणि नातेवाईक मनोज पावरा हे देखील भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपी किरण मलजी पावरा व इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या प्रकरणी सुरेश घुरसिंग पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भिवा घुरसिंग पावरा (वय ३७), वसंत किरण पावरा (वय २२), राकेश मुन्ना पावरा (वय २५), गणेश मुन्ना पावरा (वय २१) आणि किरण मलजी पावरा (वय ५८, सर्व रा. कोळपांढरी, ता. शहादा) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. मोहन शंकर सावळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









