---Advertisement---
भुसावळ शहरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला अखेर भुसावळ पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव जाकीर उस्मान शेख राहणार इस्लामपुरा जळगाव असे आहे. सदर आरोपी हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता व वेगवेगळ्या ठिकाणी तो लपत बसून पोलिसांना चकवा देत होता.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी भुसावळ शहरात झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. तर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबतचा तात्काळ तपास सुरू केलेला होता. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जाकीर शेख हा सतत त्याचे ठिकाण बदलत होता आणि त्या ठिकाणाहून फरार होत होता. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जाळं सक्रिय केलं. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं आणि अखेर पोलिसांना हे यश आलेलं आहे.
पोलीस निरीक्षक राहूल वाघ यांच्या आदेशानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणात सक्रिय होते. तसेच त्यांनी या पथकाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात सापळा रचला आणि अखेर या फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे. तो आरोपी जळगाव शहराच्या इस्लामपुरा परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आणि तात्काळ पोलीस पथक त्या ठिकाणी गेले आणि त्याला अटक केली.
या यशस्वी कारवाईत पोलीस पथकातील हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा, महेंद्रसिंग पाटील, चंद्रकांत रायपूरकर आणि मोसिन शेख यांचा समावेश असून संयुक्तपणे करण्यात आलेली ही कारवाई यशस्वी झाली आहे. या आरोपीस अटक केल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतील सत्य आता उघड होणार असून त्याबाबतचा पोलीस तपास करत आहेत.









