देवगाव हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; आरोपी ठरला दोषी, 10 वर्षांचा सश्रम कारावास….

---Advertisement---

 

चोपडा तालुक्यातील देवगाव येथे 2021 मध्ये घडलेल्या हत्या प्रकरणात अमळनेर येथील सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33, रा. पुनगाव ता. चोपडा, सध्या रा. देवगाव) यास न्यायालयाने दहा वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. या निकालामुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अडावद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2021 अन्वये दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाची सुनावणी सत्र प्रकरण क्रमांक 13/2022 अंतर्गत झाली. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास देवगाव येथील प्लॉट भागात फिर्यादी भावना रवींद्र पाटील यांच्या घरासमोर ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती रवींद्र विश्राम पाटील हे दारूच्या नशेत पत्नीशी वाद घालत होते. यावेळी आरोपी चंद्रशेखर सपकाळे यांनी वादात हस्तक्षेप करत रवींद्र पाटील यांच्याशी शाब्दिक वाद घातला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने रवींद्र पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले.
यानंतर आरोपीने जवळच असलेल्या बैलगाडीचे लाकडी शिंगाडे उचलून रवींद्र पाटील यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी 16 ऑक्टोबर 2021 रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शव विच्छेदन अहवालात मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सुरवातीला आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. एकूण 9 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली असून फिर्यादी पत्नी, मयताचे वडील तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवराज यांनी सादर केलेल्या विच्छेदन अहवालामुळे मृत्यूचे कारण निर्विवाद सिद्ध झाले. सर्व पुरावे आणि साक्षींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. भादंवि कलम 304 भाग-2 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाच्या तपासात अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सतीश भोई, राहुल रणजीत, पारोळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक उदयसिंग साळुंखे, चोपडा ग्रामीणचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे, चोपडा शहरचे प्रमोद पाटील तसेच मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल भरत ईशी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---