---Advertisement---
पहाटे २ वाजता रामेश्वर कॉलनीत खळबळ; सखोल चौकशी व तात्काळ मदतीची मागणी
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील साई गजानन सोसायटीमध्ये आज पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून अंदाजे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेक कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या सोसायटीमध्ये प्रामुख्याने कामगार व कष्टकरी वर्ग राहतो. अनेक रहिवाशांनी कर्ज काढून किंवा हप्त्यांवर दुचाकी खरेदी केल्या होत्या. अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या उपजीविकेवरच परिणाम झाला असून सर्व कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात आहेत. कुणीतरी अज्ञात माथेफिरू व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली असावी, किंवा एखाद्या इलेक्ट्रिक दुचाकीतून शॉर्टसर्किट होऊन आग लागून ती इतर वाहनांपर्यंत पसरली असावी, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
या संदर्भात सोसायटीतील रहिवासी सागर अशोक पाटील यांनी प्रशासनाकडे सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत जाहीर करून आर्थिक दिलासा द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.









