---Advertisement---
नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथे पतीला विजेच्या धक्क्यातून वाचवताना पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छाया दीपक खाडे (वय 38) असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती दीपक खाडे (वय 42) हे शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजता शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. वीजपंप सुरू करण्यासाठी त्यांनी मोटरच्या स्टार्टरचे बटण दाबताच त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला.
पती अडचणीत असल्याचे लक्षात येताच छाया खाडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी धैर्याने पतीला जोरात ढकलून विजेच्या प्रवाहापासून दूर केले. त्यामुळे दीपक खाडे यांच्या जीवावरील संकट टळले; मात्र हे करताना छाया खाडे स्वतः विजेच्या संपर्कात आल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छाया खाडे या अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, छाया व दीपक खाडे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मोठी मुलगी बारावीची परीक्षा देत असून, या दुःखद प्रसंगात तिच्या डोक्यावरचे मातृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे खाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









