---Advertisement---
रेल्वेच्या जनरल डब्ब्यातून रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत असुविधा, अस्वच्छता आणि दुर्लक्ष यामुळे जनरल डब्ब्यातील प्रवास त्रासदायक ठरत होता. मात्र आता हे चित्र बदलणार असल्याची मोठी घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे सेवांमध्ये दर आठवड्याला तब्बल ५२ सुधारणा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या सुधारणांचा थेट फायदा जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे.
आतापर्यंत एसी आणि स्लीपर कोचमध्येच नियमित स्वच्छता केली जात होती. मात्र आता जनरल डब्यांनाही तितक्याच प्राधान्याने स्वच्छ ठेवले जाणार आहे. जनरल डब्यातील शौचालये, वॉशबेसिन, कचरापेट्या यांची दररोज स्वच्छता केली जाणार आहे.
पूर्वी जनरल डबे इतर कोचशी आतून जोडलेले नसल्याने धावत्या गाड्यांमध्ये स्वच्छता करणे अवघड जात होते. आता मात्र गाडी स्टेशनवर थांबल्यानंतर कर्मचारी आरक्षित डब्यांतून उतरून थेट जनरल डब्यांमध्ये जाऊन स्वच्छतेचे काम पूर्ण करणार आहेत.
रेल्वे प्रशासन आता स्वच्छतेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर डब्यांचे फोटो कंट्रोल रूमला पाठवले जातील. एआय प्रणालीद्वारे त्या फोटोंचे विश्लेषण केले जाईल. काम दर्जेदार नसेल तर संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
स्वच्छता कामासाठी अनुभवी कंपन्यांचीच निवड केली जाणार असून सुपरवायझरकडे किमान १२ वी उत्तीर्ण व आयटीआय पात्रता असणे बंधनकारक असेल.
या निर्णयामुळे जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे









