महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर, जळगावची निवडणूक चर्चेची ठरणार? कोण आहेत इच्छूक?

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवणुकीचं संपूर्ण वेळापत्रक कसं असेल हे आपण जाणून घेऊ….

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून लवकरच पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १७ जागांसाठी अखेर अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडेल.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघातील किमान ७५% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५% मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रात या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे या १६ जागांवर वेळेत निवडणूक घेता आली नव्हती. मात्र, आता या सर्व अटी व निकष पूर्ण झाले असल्याचा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (CEO) दिल्यानंतर निवडणूक आयोगाने तत्परतेने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जळगाव विधान परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता नव्या चेहऱ्यांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. तर, या निवडणुकीसाठी नवनियुक्त नगरपालिका, नगरपंचायत व महापालिकेच्या नगरसेवकांसह लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना मतदानाचा हक्क असेल. तर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नसेल हे स्पष्ट झाले आहे. भाजपाकडून नंदू अडवाणी, नंदू महाजन आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही पुन्हा एकदा या जागेवर दावा करण्यात आला आहे. जळगाव विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेने यापूर्वी दोन वेळा निवडणूक लढवली होती मात्र आता तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे शिवसेनेकडून इच्छुक असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान संख्याबळाचा विचार करता महायुतीला निर्णायक बहुमत असल्याने महायुतीचाच आमदार होणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिकृत अधिसूचना जारी करणे : २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी : ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिनांक : १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)

सदस्यांचा कार्यकाळ संपलेल्यांची नावे

सोलापूर: प्रशांत प्रभाकर परिचारक
अहमदनगर: अरुणकाका बालभीमराव जगताप
ठाणे: फाटक रवींद्र सदानंद
जळगाव: चंदूभाई व्ही. पटेल
सांगली-कम-सातारा: कदम मोहनराव श्रीपती
नांदेड: अमरनाथ अनंतराव राजूरकर
यवतमाळ: दुष्यंत सतीश चतुर्वेदी
पुणे: अनिल शिवाजीराव भोसले
भंडारा-कम-गोंदिया: डॉ. परिणय रमेश फुके
रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग: अनिकेत सुनील तटकरे
नाशिक: नरेंद्र भिकाजी दराडे
वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली: रामदास भगवानजी आबिटकर
अमरावती: प्रवीण रामचंद्र पोते
उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड: सुरेश धस
परभणी-कम-हिंगोली: विप्लव गोपीकिसन बजोरिया
औरंगाबाद-कम-जालना: अंबादास दानवे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---