---Advertisement---
जळगाव शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. २० वर्षीय श्याम प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात संबंधित मारहाण करणाऱ्या प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, श्याम हा जळगाव शहरालगत शिरसोली रोड वर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये झालेल्या वादानंतर प्राचार्यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर पीव्हीसी पाईपने श्यामला मारहाण करून अपमान केल्याचा सुसाईड नोटमध्ये आरोप श्याम ने केला आहे. ही बाब श्यामने आपल्या कुटुंबीयांना देखील सांगितली होती.
१४ फेब्रुवारी रोजी श्यामने त्याच्या वडीलांना आणि काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर जळगाव शहरातील नेहरू नगर येथील राहत्या खोलीत त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त करण्यात आली असून त्यामध्ये प्राचार्यांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.
मृत श्यामच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांचा शोधही घेतला जात आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









