---Advertisement---
धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची केली पाहणी; १५ जूनपर्यंत २८९ कामे पूर्ण करण्याचे नियोजन
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आगामी पावसाळा आणि सध्याची पाणीटंचाईची भीषण परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करिश्मा नायर यांनी गुरुवारी (दि. २१) धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प व बंधाऱ्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. “ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे गतीने करा, मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत आणि दर्जाबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
जिल्ह्यात सध्या जलसंधारण विभागामार्फत तब्बल ३४५ सिंचन कामांना मंजुरी देण्यात आली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून, कामांचा धडाका सुरू केला आहे.
एकूण मंजूर कामे: ३४५
कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर): २८९ कामांना
पूर्ण झालेली कामे: १०५
१५ जूनचे लक्ष्य: सर्व २८९ कामे पूर्ण करण्याचे नियोजन
फायदा काय?
ही सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार आहे. सध्या ग्रामीण भागात नाले आणि ओढ्यांवर बंधारे बांधून पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
धरणगाव तालुक्यातील ‘या’ गावांना भेटी
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवारी धरणगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. यात झुरखेडे, शेरी, बांभोरी, सोनवद, पाळधी, जांभोर आणि पिंप्री खुर्द येथे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामांची बारकाईने पाहणी केली. तसेच तांत्रिक बाबी तपासून घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडीचीही घेतली झाडाझडती
सिंचन प्रकल्पांच्या पाहणी दौऱ्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचाही आढावा घेतला. त्यांनी झुरखेडा येथील आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडीला अचानक भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. याशिवाय सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (PHC) भेट देत रुग्णांना मिळणाऱ्या सेवा आणि औषध साठ्याची तपासणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या या धडक दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती.









