---Advertisement---
जळगाव कार्यालयासमोर महिलांची गर्दी | ई-केवायसीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत सध्या विविध समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) पसरणाऱ्या चुकीच्या बातम्या आणि अफवांवर महिला भगिनींनी विश्वास ठेवू नये. शासनस्तरावरून ई-केवायसीसंदर्भात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हा कार्यालयात गर्दी करू नये, असे स्पष्ट आवाहन जळगावचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषीकेश काळे यांनी केले आहे.
सोशल मीडियावरील ‘त्या’ बातम्या दिशाभूल करणाऱ्या!
सध्या प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर, “लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे. ज्या महिला ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करू शकल्या नाहीत, त्यांना आता थेट जिल्हा महिला व बालविकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा सरकारने दिली आहे,” असा दावा करणारी बातमी व्हायरल होत आहे.
प्रशासनाचा खुलासा
ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी ३१ डिसेंबर २०२५ हीच अर्जाची व ई-केवायसीची अंतिम मुदत होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. तसेच कार्यालयात कागदपत्रे जमा करून घेण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय किंवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही.
या चुकीच्या बातम्यांमुळे जळगाव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासमोर सकाळपासूनच लाभार्थी महिलांची विनाकारण मोठी गर्दी पाहायला मिळाली. सध्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या आग्रहास्तव त्यांची ई-केवायसी झाली आहे की नाही, याची पडताळणी संगणकावर करून दिली जात आहे; मात्र कोणतीही मुदतवाढ नसल्याने सद्यस्थितीत नवीन ई-केवायसी अपडेट केली जात नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
योजनेचा लाभ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि पोषण सुधारण्यासाठी थेट बँक खात्यात जमा केला जात आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे, अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत. त्यामुळे महिलांनी जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुरुस्तीची मुदत ३० एप्रिलपर्यंतच होती!
चुका दुरुस्तीची मुदत : ज्या महिलांनी आधी ई-केवायसी केली होती, परंतु त्यात काही चुका झाल्या होत्या, त्यांना ती दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.
कार्यालयात येण्याची गरज नाही : अशा दुरुस्ती केलेल्या महिलांनाही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महिला व बालविकास कार्यालयात येण्याची अजिबात आवश्यकता नाही.
”महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जिल्हा कार्यालयात विनाकारण गर्दी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.”
ऋषीकेश काळे (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव)









