जळगावात उपनिबंधक दीड लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

 

जळगाव : सहकार विभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार समोर आला असून जळगावमध्ये वर्ग-१ उपनिबंधक आणि त्याच्या खासगी एजंटला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देणे तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप उपनिबंधक (सहकारी संस्था, वर्ग-१) जगदीश बाबुराव बारी यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांचा खासगी एजंट देविदास धनसिंग पाटील याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.


तक्रारदाराविरोधात सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशीदरम्यान पुढील सुनावणीबाबत माहिती घेण्यासाठी ते उपनिबंधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी आरोपींकडून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाखांवर निश्चित करण्यात आली आणि पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने १८ मे रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच दिवशी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाचेची रक्कम खासगी एजंट देविदास पाटील याच्याकडे देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे निष्पन्न झाले.


२० मे रोजी दुपारी बी. जे. मार्केट परिसरातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना देविदास पाटील याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर उपनिबंधक जगदीश बारी आणि एजंट देविदास पाटील यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---