---Advertisement---
तालुक्यातील एका गावात तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीसोबत ६५ वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या विकृत कृत्यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घराची तोडफोड केल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने पावले उचलत संशयित नराधमाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ६५ वर्षीय संशयित आरोपी शांताराम चैत्राम परदेशी याने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद चाळे केले. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांताराम परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या बालिकेसोबत घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत संशयित आरोपीच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याच्या घराची तोडफोड केली. यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि संशयित आरोपी शांताराम चैत्राम परदेशी याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस अत्यंत गांभीर्याने करीत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातून संताप व्यक्त होत असून, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









