धरणगावात पेट्रोल पंपावर रात्री चक्क बसल्या जेवणाच्या पंगती! डिझेलसाठी रात्रभर मुक्काम; इंधन टंचाईची भीषणता उघड

---Advertisement---

 

जळगावच्या धरणगाव शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत असून, डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांना चक्क पेट्रोल पंपावर रात्रभर मुक्काम करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. इंधनाची टंचाई किती गंभीर बनली आहे, याची प्रचिती गुरुवारी रात्री धरणगावात आली, जेव्हा डिझेलच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो नागरिकांसाठी पेट्रोल पंपावरच जेवणाच्या पंगती उठल्या.
​दुपारपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा
मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरा डिझेलची गाडी येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामीण भागासह शहरातील शेतकरी आणि नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लावण्यास सुरुवात केली होती. ट्रॅक्टर, गाड्या आणि कॅन घेऊन नागरिक तासन् तास उन्हात आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारात डिझेल मिळण्याच्या आशेने उभे होते.

अनेक शेतकरी आणि नागरिक दुपारपासून अन्न-पाण्याविना पंपावर थांबून होते. ही विदारक आणि हलाखीची परिस्थिती पाहून धरणगाव येथील पेट्रोल पंप चालकांनी सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. त्यांनी दुपारपासून उपाशीपोटी थांबलेल्या सर्व शेतकरी आणि नागरिकांसाठी थेट पेट्रोल पंपावरच रात्रीच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली. यामुळे रात्री पंपाच्या परिसरात चक्क जेवणाच्या पंगती बसल्याचे पाहायला मिळाले.


​ग्रामीण भागात इंधन संकट अधिक तीव्र
पंप चालकांच्या या मदतीमुळे नागरिकांना तात्कालिक दिलासा मिळाला असला, तरी हक्काच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांना दिवसासह रात्रभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात ग्रामीण भागातील डिझेल टंचाई कमालीची वाढल्याने शेतीची कामे खोळंबण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर इंधन टंचाईवर प्रशासन कधी तोडगा काढणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---