जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन नवीन जिल्हाध्यक्षांची निवड अखेर जाहीर

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या जळगाव जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बदलांना अखेर मुहूर्त मिळाला असून काँग्रेस हायकमांडकडून तीन नवीन जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने रात्री उशिरा या नियुक्त्या जाहीर केल्या. या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्ष संघटनेत नव्या आणि निष्ठावंत चेहऱ्यांना संधी देत काँग्रेसने यावेळी ‘भाकरी फिरवण्याचा’ प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. नव्या नियुक्त्यांमध्ये रावेर लोकसभा क्षेत्र अर्थात जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. अविनाश भालेराव यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी जमील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


धनंजय चौधरी हे जळगाव काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.
धनंजय चौधरी यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यानंतर आता चौधरी कुटुंबातील चौथ्या पिढीला काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली आहे.


दरम्यान, मावळते जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी यापूर्वीच जिल्ह्यात एकाऐवजी तीन जिल्हाध्यक्ष नेमले जाणार असल्याचे संकेत दिले होते. पक्षाची वाढती व्याप्ती आणि भौगोलिक रचना लक्षात घेता काँग्रेसने जळगाव पूर्व, जळगाव पश्चिम आणि महानगर अशा तीन विभागांमध्ये संघटनात्मक फेररचना करत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---