भुसावळकर हैराण: गेल्या ६ महिन्यांपासून जामनेर रोडवरील काम ठप्प; तातडीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…

---Advertisement---

 

भुसावळ शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जामनेर रोडवरील चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीआरएफ (Central Road Fund) आणि हायब्रीड अॅन्युइटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या या कामामुळे सध्या वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या प्रकल्पांतर्गत नाहाटा चौफुली ते जामनेर शहर मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत आहे.
गजानन महाराज मंदिर ते चोरवड गाव (४४/५०० ते ५८/१००) या विभागासाठी सुमारे २५ कोटी रुपये निधी मंजूर.
यावल रोड, गांधी पुतळा ते गजानन महाराज मंदिर (४५/२०० ते ७५/५००) या विभागासाठी तब्बल १८२ कोटी रुपये निधी मंजूर.
मात्र प्रत्यक्षात गजानन महाराज मंदिर ते चोरवड दरम्यानचा मोठा भाग अद्याप अपूर्ण आहे.

रस्त्याची एक बाजू पूर्ण न झाल्याने वाहतूक केवळ एका बाजूनेच सुरू आहे. परिणामी वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत आहे. अपूर्ण रस्त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघाताचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साईबाबा मंदिर परिसरात दोन महिन्यांपूर्वी केलेले काँक्रिटीकरण अल्पावधीतच खराब झाल्याचे दिसून आले आहे. काँक्रिटमधून खडी बाहेर पडू लागल्याने संबंधित विभागाने आता डांबराचे ठिगळ लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे कोट्यवधींचा निधी वाया गेला आहे. काम संथ गतीने सुरू असल्याने दैनंदिन प्रवास त्रासदायक बनला आहे.

स्थानिक रहिवाशांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि काम तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने गुणवत्ता नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास भुसावळ ते जामनेर दरम्यानची वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची ठप्प स्थिती आणि निकृष्ट दर्जामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. आता स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---