जळगावकर प्रवाशांसाठी खुशखबर; मेमू, शिर्डी-बिकानेर आणि मुंबई-रिवा गाड्यांना मुदतवाढ

---Advertisement---

 

प्रवाशांची वाढती गर्दी आणि आगामी सुट्ट्यांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भुसावळ मंडळांतर्गत धावणाऱ्या बडनेरा-नाशिक रोड मेमू, साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष तसेच मुंबई-रिवा विशेष गाड्यांच्या सेवांना वाढीव कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

बडनेरा-नाशिक रोड मेमू १५ जुलैपर्यंत धावणार :

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष मेमू यापूर्वी २८ फेब्रुवारीपर्यंत चालविण्याचे नियोजन होते. मात्र आता ही सेवा १ मार्च ते १५ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे ०१२१२ नाशिक रोड-बडनेरा ही परतीची विशेष मेमू देखील १५ जुलै २०२६ पर्यंत धावणार आहे. ही गाडी जळगाव जिल्ह्यातील बोदवड, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, पाचोरा, कजगाव आणि चाळीसगाव जंक्शन या स्थानकांवर थांबे घेते. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष २८ मार्चपर्यंत धावणार :

गाडी क्रमांक ०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष आता २८ मार्च २०२६ पर्यंत दर शनिवारी धावणार आहे. परतीची ०४७१६ साईनगर शिर्डी-बिकानेर विशेष गाडी २९ मार्च २०२६ पर्यंत दर रविवारी चालवली जाणार आहे.

राजस्थानातील खाटुश्याम दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी विशेष सोयीची ठरणार आहे. अप डाऊन मार्गावर रिंगससह राजस्थानमधील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत. तसेच मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, जयपूर आदी प्रमुख स्थानकांवरही दोन्ही दिशेने थांबे कायम ठेवण्यात आले आहेत.

मुंबई-रिवा विशेष गाड्यांनाही विस्तार:

मुंबई–रिवा दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८८ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रिवा विशेष ही २७ फेब्रुवारी ते २६ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी एकूण १७ फेऱ्या धावणार आहे. तसेच ०२१८७ रिवा–मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ही २६ फेब्रुवारी ते २५ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी १७ फेऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.

या गाड्यांना अप आणि डाऊन मार्गावर इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ आणि खंडवा येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांना थेट मुंबई-रिवा जोडणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---