---Advertisement---
जळगाव जिल्हयातील यावल तालुक्यात एका स्वस्त धान्य दुकानावर प्रशासनाने कडक कारवाई करत परवाना रद्द केला आहे. जुलै २०२५ या महिन्यातील धान्याचे वाटप न केल्याचे आणि साठ्यात मोठी तफावत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी अनामत रक्कम जप्त करून परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील यो. बा. नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकानास सावखेडे येथील वि.का. सोसायटीचे दुकान संलग्न करण्यात आले होते. मात्र तपासणीत लाभार्थ्यांना कमी-जास्त प्रमाणात धान्य वाटप झाल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे जुलै २०२५ मधील धान्याचे वाटपच न केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी धान्यसाठ्यात मोठी तफावत आढळली.
तपास अहवालानुसार, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांच्या गव्हापोटी १ लाख ६६ हजार १४४ रुपये आणि तांदळापोटी ३ लाख ४५ हजार ६२० रुपये इतकी रक्कम वसुलीस पात्र ठरली आहे. याप्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर १७ तारखेला कारवाईचे आदेश जारी करण्यात आले.
तसेच सावखेडे सीम येथील दुकानातील धान्य तफावतीपोटी ५ लाख ११ हजार ७६४ रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम अपहाराच्या दिनांकापासून राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्याजदराने वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, परवाना रद्द झाल्यामुळे चुंचाळे येथील लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नायगाव येथील परवानाधारक जितेंद्र बोरसे यांच्या दुकानास जोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या कारवाईनंतर तालुक्यातील इतर स्वस्त धान्य दुकानदारांवरही प्रशासनाची नजर असल्याचे संकेत मिळत आहेत.









